‘पुस्तक’ आणि ‘अंक’ यातला फरक म्हणजे पुस्तक ही एकाच लेखकाची एकसंध कलाकृती असते, तर अंक हा अनेकविध लेखकांच्या, कवींच्या आणि व्यंगचित्रकारांच्या कलाकृतींनी नटलेला-सजलेला असतो. दिवाळी अंक हा तर दिवाळीच्या फराळासारखाच अनेक जिन्नसांनी भरलेला, एक खुसखुशीत असा साहित्यप्रकार मानला जातो. त्यामुळे दिवाळी इतकीच दिवाळी अंकाचीही  लोकं आतुरतेने वाट पाहत असतात.

आजकाल अवांतर वाचन कमी झाल्याची खंत ऐकू येते. अशा वेळी सातासमुद्रापलीकडे राहताना काही उत्तम, वाचनीय, दर्जेदार साहित्य एखाद्या अंकाच्या स्वरूपात एकत्र आणावं असं आम्हाला वाटलं आणि या सद्विचाराच्या उर्मीने आम्ही ‘अंक निनाद’ हा वार्षिक अंक गेल्या वर्षी सुरु केला. वाचकांच्या उत्तम प्रतिसादाने आम्हाला ऊर्जा मिळाली. दर वर्षी साधारण नोव्हेंबर-डिसेंबर च्या दरम्यान हा अंक वाचकांपर्यंत घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे याला अगदी “दिवाळी अंक” म्हणता नाही आले, तरी “हिवाळी अंक” नक्कीच म्हणता येईल!         

 जगभरातल्या लेखकांचे उत्तमोत्तम साहित्य एकत्र आणण्याचा आमचा मानस आहे. त्यातले काही लेखक प्रथितयश असतील, तर काही लेखक भविष्यकाळात प्रथितयश होणार असतील! त्यातले काही लेखक वयाने ज्येष्ठ आणि प्रमाण भाषेत लिहिणारे असतील, तर काही अमेरिकेतले, सेकंड जनरेशनचे इंग्रजीत लिहिणारे असतील. हा अंक सगळ्या प्रकारच्या लेखकांचा असेल आणि तो सर्व प्रकारच्या वाचकांचा ठरावा, ही अपेक्षा. भाषा मराठी असली काय, किंवा नसली काय… लिहिणाऱ्यांची आणि वाचणाऱ्यांची मने मराठी असतील एवढं नक्की! 

घेऊन येतोय… ‘अंक निनाद’ – शब्द मराठी मनाचा!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *