Our Team

Amita Modak Joshi
Chair
Kiran Ingle
Treasurer
Sanjay Mehendale
Editor
Gauri Alate
Design & Layout Lead
Vikrant Patwardhan
Marketing lead
Anjali Anturkar
President
Niteen Joshi
Editor
Medha Umarji
Editor
Mansi Dahanukar
Design Lead
Anagha Huprikar
Marketing Lead
Sushant Khopkar
Managing Editor
Jyotsna Diwadkar
Editor
Uma Kanade
Editor
Sheetal Sonar
Website Lead

संपादकीय – from Ank Ninad issue 1

निनादच्या शुभारंभाच्या या अंकाचं मुखपृष्ठ आपल्या समोर ठेवताना अनाहूतपणे मन बालपणात गेलं.

‘वह कागज़ की कश्ती

वह बारिश का पानी….’

सुदर्शन फाकिरची कविता तर आठवलीच, पण त्या बरोबर आयुष्याच्या प्रवासासारखी भासणारी ही कागदी होडी एक चिंतनाचा विषयसुद्धा झाली. ही होडी वाहत्या पाण्यावर आरूढ होऊन डौलानं चाललेल्या एका मनस्वी आणि स्वाभिमानी जीवनाचं प्रतीक असेल का? की क्षणभंगूर नश्वर जीवनाचंच एक रूप असेल? कदाचित अनंताच्या वाटेवर निघून गेलेल्या एखाद्या सुहृदाचं स्मरण? होडीचं पाण्यातलं प्रतिबिंब हे मनाच्या आरशात स्वतःला पाहण्याचा प्रयत्न असेल?

सभोवतालची वलयं ही आयुष्याच्या चक्रव्यूव्हाची द्योतकं असतील की त्या वलयांकित आव्हानांवर स्वार होऊन, प्रसंगी झुंजून प्रवाहात स्वतःची वेगळी वाट मागे सोडू पाहणं? या सगळ्या विचारांनंतर पुन्हा जाणवतं ते होडीचं अल्पायुष्य! अर्थात ‘आयुष्य किती आहे’ यापेक्षा ते आपण ‘कसं जगतो’ हे महत्त्वाचं असतं. काय मिळवायचं असतं नेमकं आपल्याला जीवनामध्ये? प्रत्येक व्यक्ती या प्रश्नाचं उत्तर वेगळं देत असते. आपली ‘प्रवृत्ती कशी आहे’ यावरच आपल्या आयुष्याची ‘आवृत्ती’ अवलंबून असते. ‘परिस्थिती बदलता येत नसेल तर मनस्थिती बदलावी’, असं म्हणतात. याचा अर्थ खरं तर ‘आपली मनस्थितीच आपली परिस्थिती ठरवत असते’….

सकारात्मक आणि नकारात्मक विचारांचं द्वंद्व प्रत्येक सर्वसामान्य मनात कायम सुरूच असतं. शायर निदा फ़ाज़ली म्हणतात,

‘दुनिया जिसे कहते हैं

जादूका खिलौना है,

मिल जाए तो मिट्टी है

खो जाए तो सोना है।’

ईर्षेने मिळवलेली गोष्ट कधी कधी मिळाल्यावर मातीमोलाची वाटते, पण तरीही ती हस्तगत करण्याची आपली वृत्ती बदलत नाही. ‘सुखी माणूस समाधानी असतोच असं नाही’ पण ‘समाधानी माणूस मात्र नक्कीच सुखी असतो’, म्हणूनच ‘जीवन जगण्याची आपली प्रक्रिया कशी आहे?’ हे महत्वाचं! असंच एक परिपूर्ण जीवन जगलेला आमचा सर्वांचा लाडका मित्र निनाद जोशी ही या वार्षिकांकाची प्रेरणा आहे.

‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या पाडगांवकरांच्या ओळींचं यथार्थ पालन करणारा निनाद खरोखर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. ‘होतं’ म्हणतांना डोळे भरून येतात, पण मन लगेच त्याच्या सुखद आठवणींत रमून जातं. संगीत, वाङ्मय, क्रिकेट, सिनेमा, नाटक…. निनाद या सर्वांवर मनापासून प्रेम करणारा होता. आयुष्याचे रूप, रस, गंध या सर्वांचा मनसोक्त आस्वाद घेणारा एक कलंदर मित्र म्हणूनच तो आमच्या चिरकाल स्मरणात राहील.

सुप्रसिद्ध शायर जाँनिसार अख़्तर लिहून गेले आहेत,

‘सदियों सदियों मेरा सफ़र,

मंज़िल मंज़िल राहगुज़र,

कितना मुश्किल कितना कठिन,

जीनेसे जीनेका हुनर|’

नुसता देह जगवण्यापेक्षा ‘जगण्याची कला’ साध्य करणं खूप कठीण असतं. निनाद जोशी नावाच्या माणसानं ती कला आत्मसात केली होती!

डेट्रॉईट, शिकागो, ऑस्टिन अशा अनेक गावांमध्ये विखुरलेल्या निनादच्या मित्रांनी एका विशिष्ट हेतूने हा उपक्रम हाती घेतला आहे. सुजाण मराठी माणसाला सर्वच अभिजात कलांविषयी प्रेम असतं. मग ते लेखन असो, संगीत असो की चित्रकला. ‘अंक निनाद’च्या माध्यमाद्वारे उत्तम प्रतीचं लिखाण हे यंदा छापील स्वरूपात आम्ही सादर करीत आहोत. यापुढील वर्षांमध्ये ते दृक-श्राव्य स्वरूपातही प्रकाशित करण्याचा आमचा मानस आहे. ‘निनाद’च्या या पहिल्या अंकात आणि या पुढच्या सर्वच अंकांमध्ये विविधतेने नटलेल्या वेचक आणि वेधक साहित्याचा नजराणा आम्ही वाचकांसाठी घेऊन येणार आहोत. भारतातल्या आणि भारताबाहेरील देशातल्या प्रतिथयश आणि नवोदित अशा सर्व प्रकारच्या साहित्यिकांच्या आणि कविवर्यांच्या रचना या अंकात समाविष्ट असतील.

अनेक मान्यवर लेखकांनी आमच्या विनंतीला मान देऊन स्नेहपूर्वक आपले लेख, कथा, कविता आम्हाला प्रकाशित करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार!

एक सर्वांगसुंदर, अभिरुचीपूर्ण अंक वाचकांच्या हाती पडावा तसेच दरवर्षी ‘ज्याची आतुरतेने वाट पाहावी’ अशी कलाकृती सादर करावी, या आमच्या मनोकामनेला आणि प्रामाणिक प्रयत्नाला तुमच्या ‘रसिकतेची दाद मिळावी’, हीच त्या जगन्नियंत्याकडे प्रार्थना!!

– नितीन जोशी and Team Ninad